*उद्या 8 एप्रिलपासून सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रातही कोव्हीड टेस्टींगला सुरुवात*

"मिशन ब्रेक द चेन" च्या प्रभावी अंमलबजावणीव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने "टेस्ट, आयसोलेशन व ट्रिट" या त्रिसूत्रीवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. या अंतर्गत सध्या कोव्हीड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली असून त्या बरोबरीनेच रुग्णालयीन बेड्स सुविधांमध्येही वाढ करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयांमध्ये 24 x 7 कोव्हीड टेस्टींग करण्यात येत असून माता बाल रुग्णालय नेरुळ व माता बाल रुग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत टेस्टींग कऱण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचे क्षेत्र असलेल्या ए.पी.एम.सी. मार्केट याठिकाणीही मार्केटच्या वेळांनुसार पहाटे 5 ते सायं. 5 पर्यंत टेस्टींग सुरु आहेत. त्याचप्रमाणे बेलापूर, नेरुळ, वाशी. सानपाडा, तुर्भे, घणसोली, रबाळे अशा 7 रेल्वे स्टेशनवरही सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत कोव्हीड टेस्टींग केले जात आहे.
सद्यस्थितीत प्रतिदिन 8500 ते 9000 इतक्या मोठ्या प्रमाणावर कोव्हीड टेस्टींग करण्यात येत असून यामध्ये अधिक वाढ करत नागरिकांना त्याच्या क्षेत्रात कोव्हीड टेस्टींग करून घेता यावे याकरिता 23 नागरी आऱोग्य केंद्रांमध्ये कोव्हीड टेस्टींग सेंटर सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिलेले आहेत.
त्यास अनुसरून सीबीडी बेलापूर, करावे, नेरुळ से. 48, कुकशेत, नेरुळ फेज 1, नेरुळ फेज 2, शिरवणे, इंदिरानगर, सानपाडा, तुर्भे, जुहूगांव, वाशीगांव, पावणे, महापे, खैरणे, घणसोली, कातकरीपाडा राबाडे, राबाडागांव, नोसिल नाका, सेक्टर 2 ऐरोली, चिंचपाडा, दिघा, इलठणपाडा अशा 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी उद्या दिनांक 08 एप्रिल 2021 पासून सकाळी 9 ते 5 या वेळेत कोव्हीड टेस्टींग सेंटर्स सुरु करण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड टेस्टींग वाढीवर भर देत असून त्यासोबतच रुग्णसंपर्कातील 30 पर्यंत व्यक्तींचा शोध (Contact Tracing) व प्रतिबंधीत क्षेत्राची (Cotainment Zone) काटेकोर अंमलबजावणी याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय कोरोना पासून बचावाची प्रतिकार शक्ती निर्माण करणा-या कोव्हीड लसीकरणावरही भर देण्यात येत असून 45 वर्षावरील प्रत्येक नागरिकाने महानगरपालिकेचे रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-04-2021 13:38:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update