*आणखी 8 पदोन्नती व 18 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचा निर्णय*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार सेवासुविधा पुरविण्याचा व शहरात सुरु असलेले प्रकल्प गती देऊन पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला असून त्याचवेळी हे काम करणा-या महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकडेही आस्थेने लक्ष देण्याचे सांगितले आहे.
त्या अनुषंगाने मागील आठवडाभरात विविध संवर्गातील 8 कर्मचा-यांना सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पदांवरून उच्च पदावर पदोन्नती तसेच 18 कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचा-यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष देत मार्गी लावण्यात येत असून त्यामुळे महापालिका कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जुलै 2021 पासून 55 संवर्गातील 601 कर्मचा-यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. 41 संवर्गातील 315 अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना लाभ मिळवून देण्यावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.
मागील दीड वर्षात 35 संवर्गातील 307 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आलेली असून यामध्ये अधिकची भर घालत 20 फेब्रुवारीला आणखी 6 संवर्गातील 8 कर्मचा-यांना वरील संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये 1 स्वच्छता निरीक्षकास स्वच्छता अधिकारी पदावर, एका लिपिक टंकलेखकास वरिष्ठ लिपिक/ कर निरीक्षक पदावर, एका वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षकास अधिक्षक / वसुली अधिकारी पदावर, 1 अधिक्षकास प्रशासकिय अधिकारी पदावर, 3 स्टाफनर्स / नर्स मिडवाईफ पदावरील कर्मचा-यांस सिस्टर इन्चार्च / नाईट सुपरवायझर या पदावर तसेच एका वरिष्ठ लिपिक (लेखा) पदावरील कर्मचा-यास उपलेखापाल / लेखा परीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या पदोन्नती मिळालेल्या 8 कर्मचा-यांपैकी स्वच्छता अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज / नाईट सुपरवायझर या 3 पदांवरील 3 कर्मचारी हे दिव्यांग आहेत. अशाप्रकारे सर्व घटकातील कर्मचा-यांवर लक्ष देण्याच्या आयुक्तांच्या निर्देशांचे प्रशासन विभागामार्फत पालन केले जात आहे.
त्याचप्रमाणे मागील दीड वर्षात 50 संवर्गातील 583 महापालिका कर्मचा-यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली असून यामध्ये 20 फेब्रुवारी 2023 च्या आदेशान्वये आणखी 5 संवर्गातील 18 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 उपआयुक्त, 2 व्रणोपचारक, 10 सहाय्यक अधिसेविका, 1 आर्टिस्ट कम फोटोग्राफर, 2 मिश्रक / औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी अशा 6 संवर्गांचा समावेश आहे.
याशिवाय या आठवड्यात 3 जणांची लिपिक टंकलेखक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्तीची संख्या 16 झालेली आहे. त्याचप्रमाणे 2 सफाई कामगारांची या आठवड्यात लाड-पागे समिती अंतर्गत वारसा हक्काने नियुक्ती करण्यात आली असून आता अशा कर्मचा-यांची सख्या 4 इतकी झालेली आहे. बारवी धरण प्रकल्पग्रस्त म्हणून शासन निर्देशानुसार यापूर्वी 59 जणांची नियुक्ती करण्यात आली असून या आठवड्यात अशा प्रकारच्या आणखी एका कर्मचा-याची भर पडलेली आहे. 2 वाहनचालक कर्मचा-यांना संवर्ग बदलून लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आलेली असून आता संवर्ग बदलाव्दारे नियुक्ती दिलेले 5 कर्मचारी झालेले आहेत.
याशिवाय प्रशासकिय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ सहाय्यक आयुक्त व प्रशासकिय अधिकारी यांच्या बदलीने पदस्थापना करण्यात आल्या आहेत. बदल्यांनुसार श्री. संजय तायडे यांची घणसोली विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, श्री. शशिकांत तांडेल यांची बेलापूर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, श्री. शंकर खाडे यांची दिघा विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, श्री. चंद्रकांत तायडे यांची परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त, श्रीम. मिताली संचेती यांची भांडार व मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त, श्री. मनोहर गांगुर्ड़े यांच्याकडे नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी पदाचा कार्यभार, श्री. सुनिल पाटील यांच्याकडे कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या प्रशासकिय अधिकारी पदाचे कामकाज सोपविण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे बदलीने पदस्थापना झालेले अधिकारी, कर्मचारी आपापल्या जागांवर सुव्यवस्थित काम करतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कोणत्याही अधिकारी, कर्मचा-याला त्याच्या सेवाविषयक बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासन विभागाला दिलेले असून अतिरिक्त आयुक्त (1) श्रीम. सुजाता ढोले व अतिरिक्त आयुक्त (2) श्री. संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर प्रत्येक कर्मचा-याला त्याचे हक्क मिळतील अशाप्रकारे कटीबध्दतेने काम करीत आहेत.
Published on : 23-02-2023 08:34:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update