रविवारी 9 फेब्रुवारीला वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयोजित भव्यतम रोजगार मेळावा
नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे व दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी ‘रोजगार मेळावा आणि मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी निवड / नोंदणी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वाशी सेक्टर 15/16 येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालायाच्या शेजारी असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शंकरराव विश्वासराव विद्यालय शाळा क्र. 28 येथे हा रोजगार मेळावा 9 फेब्रुवारीला, सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत संपन्न होत असून विविध क्षेत्रातील पन्नासहून अधिक मानांकित कंपन्या यामध्ये सहभागी होत आहेत.
या कंपन्यांमार्फत पात्रतेनुसार सरळ मुलाखतींव्दारे प्रत्यक्ष निवड करण्यात येऊन तात्काळ नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. याव्दारे तरूणांना नामांकित कंपन्या व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेतच शिवाय तरूण-तरूणींना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या संस्थांमार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी समुपदेशन करण्यात येऊन प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.
त्यामुळे मेळाव्यासाठी येताना इच्छुक तरूण, तरूणींनी फोटो असलेले कोणतेही शासकीय ओळखपत्र, बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईजचे 3 फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्याकरिता http:/www.nmmcjobfair20.com या वेबसाईटवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असून याबाबत Jobfairnmmc हे ॲपही गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले जाऊ शकते. याशिवाय 9833761826 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही नाव आणि शैक्षणिक पात्रता नमूद करून नोंदणी सुविधा उपलब्ध आहे.
तरी युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या या रोजगाराच्या चांगल्या संधी वाया दवडू नयेत तसेच कौशल्य प्रशिक्षण घेणा-या इच्छुक युवा वर्गानेही आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 06-02-2020 11:16:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update