1.28 लाखाहून अधिक नवी मुंबईकरांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात रस्त्यावर उतरून केले एक साथ एक तास श्रमदान

‘निश्चय केला, नंबर पहिला’ अशी स्वच्छता जिंगल गात स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर, सुप्रसिध्द संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो ज्येष्ठ नागरिकांसमवेत आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला.
याप्रसंगी पद्मश्री शंकर महादेवन यांचे समवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक श्री. नवनाथ वाठ, नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, माजी नगरसेवक श्री. संपत शेवाळे व श्रीम. नेत्रा शिर्के तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 775 हून अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला त्याचप्रमाणे सेक्टर 9 वाशी येथील मिनी सी शोअर जुहूगाव चौपाटी परिसरात 255 तृतीयपंथी नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवून नवी मुंबईच्या स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग असे नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडविले. नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा महानगरपालिकेने निश्चित केलेल्या 267 ठिकाणी तसेच इतर शासकीय व खाजगी कार्यालये, सोसायट्या, संस्था यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये 1 लाख 28 हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छतेविषयी जागरूकतेचे व नवी मुंबईच्या एकात्मभावाचे दर्शन घडविले.
याशिवाय आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात व आमदार श्री. रमेश पाटील यांनी घणसोली येथील शेतकरी शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यालय येथे स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. टीएस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थच्या परिसरातील सागरी किना-याशेजारील खारफुटी परिसरात आयकर विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहीमेत मुख्य आयकर आयुक्त श्री. संजय कुमार यांचे समवेत अभिनेते श्री. राजकुमार राव व श्री. सुनील ग्रोव्हर यांचेसह आयकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्साही सहभाग घेतला.
‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेतून नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन – पद्मश्री शंकर महादेवन
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले असून मा. पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण राष्ट्राला केलेल्या आवाहनानुसार, महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री महोदयांनी आजची मोहीम ही व्यापक लोकचळवळ व्हावी या व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेत लाखो नवी मुंबईकर नागरिक रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी श्रमदान करताहेत यातून आपल्या शहराच्या एकीची शक्ती दिसून येते असे मत पद्मश्री शंकर महादेवन यांनी व्यक्त करीत या स्वच्छतेच्या सवयीचा प्रत्येक नागरिकाने कायमस्वरूपी अंगिकार करावा असे आवाहन केले.
लाखभर नागरिकांच्या सहभागातून मा. मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित लोकचळवळ साकारली – आयुक्त राजेश नार्वेकर
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने देशातील निवडक ठिकाणांवर केंद्रीय पथकाने येऊन छायाचित्रीकरण केले त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि नवी मुंबई या दोनच शहरांचा समावेश होता ही आपल्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे मत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. संपूर्ण नवी मुंबई शहरात महानगरपालिकेने निश्चित केलेली 267 ठिकाणे याशिवाय नवी मुंबईतील विविध शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, संस्था, सोसायट्या, नागरिकांचे समुह यांनीही आपापल्या स्तरावर मा. पंतप्रधान महोदयांच्या आवाहनास अनुसरून स्वच्छतेसाठी श्रमदान केले याबद्दल समाधान व्यक्त करीत आयुक्त महोदयांनी सव्वा लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ठिकठिकाणी सहभागी होत नेहमीप्रमाणेच विक्रमी प्रतिसाद दिला व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हा कार्यक्रम लोकचळवळ व्हावा या संकल्पनेला सार्थ ठरविले याबद्दल नागरिकांचे आभार मानले. नवी मुंबईकर नागरिकांची ही एकजूटच आपल्याला नेहमी आघाडीवर ठेवते असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वच्छता मोहीम यशस्वीतेचे सूक्ष्म नियोजन
शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल 267 ठिकाणी संपन्न झालेल्या या स्वच्छता मोहीमेचे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाने सूक्ष्म नियोजन केले होते. याकरिता प्रत्येक स्वच्छता स्थळासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या समन्वयकाने स्वच्छता मोहीम राबवित असलेल्या स्थळावर सफाई करण्यापूर्वीच्या स्थितीची छायाचित्रे, सफाई करतानाची छायाचित्रे व सफाई झाल्यानंतरची छायाचित्रे व व्हिडिओ लघुचित्रफिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्व समन्वयकांचे रिसतर प्रशिक्षण घेण्यात आले होते. या समन्वयकांनी जिओ टॅगींगसह काढलेली छायाचित्रे केंद्रीय वेबपेजवर अपलोड करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज तात्काळ कृती कक्ष स्थापन केला होता. इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छता मोहीमेची ठिकाणे नवी मुंबईत खूप जास्त असल्याने आणि केंद्रीय वेबपेजवर छायाचित्रे व व्हिडिओसह माहिती अपलोड करण्याची निर्धारित वेळ असल्याने याविषयी पूर्ण खबरदारी घेत पूर्वनियोजन करण्यात आले होते.
आबालवृध्द, महिला आणि विशेषत्वाने तृतीयपंथीयांचा सक्रिय सहभाग – केंद्रीय पथकाकडून विशेष दखल
नुकतेच 17 सप्टेंबरला महापालिका क्षेत्रातील आठ प्रशासकीय विभागांत 1 लाख 14 हजार इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली, ज्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. त्यानंतर लगेचच हा उपक्रम संपन्न होत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांचा प्रचंड उत्साह संपूर्ण नवी मुंबईत रस्तोरस्ती दिसून आला. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आबालवृध्द उत्स्फुर्तपणे शहर स्वच्छतेचा ध्यास घेऊन या उपक्रमात सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात गटागटाने जमून स्वच्छता मोहीमा राबविल्या. यामध्ये मुली, युवती व महिलांची संख्याही लक्षणीय होती. विशेष म्हणजे मिनी सी शोअर वाशी येथे 200 हून अधिक तृतीयपंथी नागरिकांनी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबवित सक्रिय सहभाग घेतला. ज्याची विशेष नोंद केंद्रीय पथकामार्फत घेण्यात आली.
संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा हा उपक्रम महानगरपालिकेने निश्चित केलेल्या 267 जागा त्यासोबतच इतर संस्था, सोसायट्या, कार्यालये, स्थानिक नागरिक गट अशा साधारणत: 300 हून अधिक ठिकाणी 1 लाख 28 हजारहून अधिक नागरिकांनी एकजुटीने एकत्र येत 1 तास श्रमदान करून यशस्वी केला. ही स्वच्छतेची सवय आम्ही कायम राखू आणि निश्चय केला, नंबर पहिला या ध्येयवाक्य. साध्य करण्यासाठी आचरणात आणू अशी प्रतिज्ञाच जणू नवी मुंबईकर नागरिकांनी श्रमदान करीत स्वकृतीतून दाखवून दिली.
Published on : 01-10-2023 14:48:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update