10 थकबाकीदारांची बँक खाती गोठवली 1 एप्रिलपासून 10 जानेवारीपर्यंत 314 कोटी मालमत्ताकर जमा अभय योजनेतून 26 कोटी जमा

नागरिकांनी आपल्या मालमत्तेचा कर भरणे ही अनिवार्य बाब असून त्यामध्ये कोणतीही तडजोड नाही. कोव्हीड काळात सर्वांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले हे लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याविषयी थकबाकीदार नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन केले जात आहे.
तरीही अनेक मोठे थकबाकीदार महानगरपालिकेस कर भरत नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेता अशा मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करून वसूलीची कारवाई करावी असेही आयुक्तांमार्फत आदेशित करण्यात आलेले आहे. अशा थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत व त्यांना अभय योजनेचा लाभ घेण्याविषयी सूचित केले जात आहे. मात्र तरीही मालमत्ताकर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मागील आढावा बैठकीत दिले होते.
त्यास अनुसरून वारंवार संपर्क साधून व नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणा-या 10 मालमत्ताकर थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात आलेली आहेत.
(1) मे. मोराज शॉपींग कॉम्प्लेक्स / सुरेंद्र कौर, बेलापूर
(2) मे. मार्स कन्स्ट्रक्शन्स कं / धनलक्ष्मी / आर, श्रीनिवासन, वाशी.
(3) श्री, व सौ. एम.एन.रॉय, वाशी
(4) मार्क कोल्ड स्टोरेज प्रा. लि., तुर्भे.
(5) मे. अक्षर डेव्हलपर्स, तुर्भे.
(6) द ॲड्रेस को-ऑप.हौ.सोसा., कोपरखैरणे.
(7) स्टार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, घणसोली.
(8) अग्रसेन को.ऑप.हौ.सोसा., ऐरोली.
त्यामधील
मे. मोरेश्वर डेव्हलपर्स (रू.2 कोटी 66 लक्ष 49 हजार) व
मे.,स्वामी समर्थ शिपींग कं. (रू. 4 लक्ष 59 हजार)
या दोन थकबाकीदारांनी तर बॅंक खाते गोठविण्यात येणार असल्याची सूचना मिळताच त्यांची थकीत मालमत्ताकर रक्कम त्वरित भरणा केलेली आहे.
महानगरपालिकेमार्फत अशा प्रकारच्या धडक कारवाईला सुरूवात झाली असल्याची माहिती मिळाल्याने आता अनेक थकीत मालमत्ताकर धारक आपल्या थकीत मालमत्ताकराचा भरणा करीत आहेत. तथापि मालमत्ताकर वसूलीची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश देत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकराविषयी कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्याचा निपटारा प्राधान्याने करावा व कोणतीही नस्ती ठोस कारणाशिवाय 7 दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट केले. प्रत्येक करवसूली अधिकारी यांच्या जबाबदा-या निश्चित करून कामात हलगर्जीपणा दिसल्यास कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले तसेच मालमत्ताकर विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीडच्या प्रादुर्भावाखाली हे वर्ष झाकोळले असले तरी या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2020 पासून 10 जानेवारी 2021 पर्यंत 314 कोटी 44 लक्ष 43 हजार रक्कमेची वसूली झालेली आहे.
डिसेंबर 2020 महिन्यात 155 कोटी 86 लक्ष रक्कमेची वसूली झालेली असून मागील वर्षी डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या 151 कोटी 12 लक्ष रक्कमेच्या तुलनेत कोव्हीडने ग्रासलेले वर्ष असूनही ती अधिक आहे.
15 डिसेंबर 2020 पासून थकीत मालमत्ताकर धारकांना दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतका आर्थिक दिलासा देणारी अभय योजना लागू करण्यात आली असून 10 जानेवारी 2021 पर्यंत 25 दिवसात अभय योजनेअंतर्गत 26 कोटी 9 लक्ष रक्कम जमा झालेली आहे. तथापि या कामगिरीने समाधानी न होता आपल्याला दिलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने काम करण्याबाबत आयुक्तांनी या बैठकीमध्ये सूचित केले.
महानगरपालिकेच्या मालमत्ताकराची देयक रक्कम नागरिकांना त्यांच्या मोबाईल संदेशाव्दारे कळावी तसेच त्याचा भरणाही ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. महानगरपालिकेची करभरणा प्रणाली अधिक अद्ययावत व सुलभ करण्याचे निर्देश संगणक विभागाला यावेळी देण्यात आले.
आपल्या कोणत्याही मालमत्तेचा कर भरणे हे मालमत्ता धारकांसाठी अनिवार्य असून या करातून मिळणा-या महसूलातूनच नागरिकांना सुविधा पुरविल्या जात असल्याने एकप्रकारे करभरणा करून नागरिक शहर विकासाला हातभार लावत असतात. त्यातही थकबाकीदार नागरिकांसाठी महानगरपालिकेने 15 फेब्रुवारी पर्यंत अभय योजना लागू केली असून अंतिम दिवसाची वाट न पाहता लगेच योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे नागरिकांना आवाहन करतानाच कोणीही मालमत्ताकर चुकविण्याचा प्रयत्न करून कायदेशीर मानहानीकारक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे सूचित करण्यात येत आहे.
Published on : 15-01-2021 13:10:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update