16 व 17 मार्चला भावे नाट्यगृहात नमुंमपा करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेप्रमाणेच नवी मुंबईतील युवा व मोठ्या कलावंतांच्या अंगभूत नाट्यगुणांना उत्तेजन मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 39 नाट्य संस्थांनी सहभागी होत हा स्पर्धा उपक्रम यशस्वी केला.
नाटक हे मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक असून अनेक कलावंत आपल्या अंगभूत कलागुणांना जोपासताना दिसतात. नवी मुंबईतही हौशी कलावंतांची मोठी संख्या असून या कलावंतांना अंगभूत कलागुण प्रदर्शित करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 10 व 11 मार्च रोजी या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नवी मुंबई, पुणे व नाशिक अशा 3 केंद्रांवर उत्साहात संपन्न झाली.
नवी मुंबई केंद्रावर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील 20 नाट्यसंस्थांनी प्राथमिक फेरीत सहभागी होत आपले एकांकिका सादरीकरण केले. सुप्रसिध्द अभिनेते श्री. शेखर फडके व श्री. रवी वाडकर यांनी नमुंमपा शाळा क्र. 28 येथील एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरीचे नवी मुंबई केंद्रावरील परिक्षण केले.
पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत निघोजकर मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. त्याठिकाणी प्राथमिक फेरीत सादर झालेल्या 10 एकांकिकांचे परीक्षण नामवंत रंगकर्मी श्री. वैभव सातपुते यांनी केले.
भगवंत नगर समाज मंदिर, मुंबई नाका, नाशिक या केंद्रांवरील प्राथमिक फेरीचे परीक्षणही श्री. वैभव सातपुते यांनी केले. त्याठिकाणी 9 एकांकिका सादर झाल्या.
अशा प्रकारे एकूण 39 एकांकिकांमधून 15 सर्वोत्तम एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून या एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. 16 व 17 मार्च रोजी अंतिम फेरीतील 15 एकांकिकांचे सादरीकरण झाल्यानंतर 17 मार्च रोजी सायं. 6 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द दिग्दर्शक श्री. कुमार सोहोनी व श्री. विजय केंकरे तसेच सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. इला भाटे करणार आहेत. सदर नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्तम 15 एकांकिका पाहण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नसून नाट्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून नाट्यकलावंतांना दाद द्यावी असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 14-03-2023 13:21:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update