19 डिसेंबरला वाजणार विष्णुदास भावे नाट्यगृहाची तिसरी घंटा

कोव्हीड काळातील लॉकडाऊननंतर 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत विविध गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या असून रंगमंचावरील प्रयोगासही कोव्हीड सुरक्षिततेचे नियम पाळून रंगभूमी दिनी शासन परवानगी देण्यात आलेली आहे.
त्यानुसार नवी मुंबईतील कला संस्कृतीचे माहेरघर मानल्या जाणा-या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातही सांस्कृतिक सादरीकरण सुरू होत आहे. 19 डिसेंबरला 'तू म्हणशील तसं' या नाटकाचा प्रयोग सायं. 4 वा. संपन्न होत असून नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विष्णुदास भावे नाट्यगृहाची तिसरी घंटा घणघणार आहे.
नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनेने संपूर्ण तयारी केली असून प्रेक्षागृह तसेच रंगभूषा कक्षासह इतर कक्ष आणि नाट्यगृहाच्या परिसराचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू राहणार असल्याने सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करीत प्रेक्षागृहातील आसनांवर एक सोडून एक रसिकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेची खबरदारी घेत नाट्यगृह व्यवस्थापनावर विविध कामे करणा-या 43 कर्मचा-यांची कोव्हीड चाचणी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 1 स्वच्छता कर्मचारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत.
कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देत प्रत्यक्ष नाट्यप्रयोगाच्या वेळीही प्रवेशव्दाराजवळ व आवश्यक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार असून 'नो मास्क - नो एन्ट्री' अशाप्रकारे कोव्हीड सुरक्षेच्या नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे.
सध्या डिसेंबर महिन्याचे नाट्यप्रयोग विविध नाट्यसंस्थांनी जाहीर केले असून 19 तारखेला 'तू म्हणशील तसं', 25 तारखेला 'पुन्हा सही रे सही', 26 तारखेला 'एका लग्नाची पुढची गोष्ट' तसेच 27 डिसेंबरला 'भयंकर आनंदाची बातमी' या लोकप्रिय नाट्यकृती रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेल्या आहेत. 16 डिसेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहाचे व्यवस्थापक तथा महापालिका उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर यांच्या शुभहस्ते तिकीट विक्रीचा नारळ फोडण्यात आलेला आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये विविध व्यवसायांप्रमाणचे नाट्य व्यवसायालाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले असून आता प्रयोगही 50 टक्के क्षमतेत करावयाचे असल्याने रंगभूमीला सांस्कृतिक आधार व नाट्यकर्मींना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी येथील महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सध्या आकारण्यात येणा-या भाड्यात 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तरी नाट्य रसिकांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात सादर होणा-या नाट्यकृतींना पुन्हा त्याच उत्साहाने दाद देण्यासाठी उपस्थित राहून मराठी रंगभूमीची सांस्कृतिकता वृध्दींगत करावी असे आवाहन आहे.
Published on : 18-12-2020 07:03:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update