200 बेड्स आयसीयू व 1000 हून अधिक बेड्सच्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्सच्या कामाची ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून नवी मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढते आहे तसेच कोरोना बाधितांची संख्या कमी होताना व मृत्यू दरातही घट होताना दिसत आहे. या जमेच्या बाजू असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी सिडको एक्झिबिशन सेंटर मधील कोव्हीड रुग्णालयांनतर डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची सुविधा तसेच राधास्वामी सत्संग आश्रम, एपीएमसी मार्केट निर्यात भवन व एम.जी.एम.रूग्णालय सानपाडा येथे ऑक्सिजन बेड्सची सुविधा यांचा उपयोग नागरिकांना मोठया प्रमाणात होईल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय येथे 200 आयसीयू बेड्स व 80 व्हेंटिलेटर्स सुविधेच्या कामाची तसेच तुर्भे येथे राधास्वामी सत्संग आश्रमातील 411 ऑक्सिजन बेड्स क्षमतेच्या डेडिकेटेड हेल्थ सेंटरच्या कामाची पाहणी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी आज केली व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तेथील विविध सुविधांची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, डॉ. डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष श्री. विजय पाटील, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, वैदयकिय आरोग्य अधिकरी डॉ. दयानंद कटके, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
से.5 नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये 200 पैकी पहिल्या टप्प्यातील 50 आयसीयू बेड्स व 20 व्हेंटिलेटर्स स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कार्यान्वित करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यातील 50 आयसीयू बेड्स तयार आहेत. त्या कक्षाची पाहणी पालकमंत्री महोदयांनी केली तसेच पुढच्या टप्प्यातील आयसीयू बेड्स कक्षाच्या जागेचीही पाहणी करुन मौलिक सूचना केल्या.
त्याचप्रमाणे से.24 तुर्भे येथे राधास्वामी सत्संग आश्रम या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरच्या अंतिम टप्प्यातील कामांचीही पालकमंत्री महोदयांनी पाहणी केली. त्याठिकाणी 411 ऑक्सिजन बेड्सची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.
अशाच प्रकारे एपीएमसी मार्केट, तुर्भे येथील निर्यात भवन याठिकाणी 514 ऑक्सिजन बेड्स आणि एम.जी.एम. रूग्णालय सानपाडा येथील 75 ऑक्सिजन बेड्स क्षमतेच्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरचे कामही आता अंतिम टप्प्यात आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि त्यांचे सहकारी नवी मुंबईतील कोव्हीडचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी अथक प्रयत्न करीत असून त्यासाठी विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या सुविधांचा उपयोग नागरिकांना चांगल्या प्रकारे होईल अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
Published on : 28-08-2020 16:49:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update