3 व 4 मार्च रोजी घणसोली येथील 40+ क्रीडांगणावर रंगणार नमुंमपा चषक 40+ क्रिकेट स्पर्धा
विविध खेळांना व्यासपीठ मिळवून देऊन नवी मुंबईतील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी महानगरपालिकेचा क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने कृतीशील राहिला आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असून नवी मुंबईतही क्रिकेटचे अनेक संघ कार्यरत आहेत व त्यांच्या विविध स्पर्धांचेही आयोजन मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. त्यातही वयाच्या चाळीशी नंतर क्रिकेट सारख्या खेळाच्या माध्यमातून स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक असणा-या क्रिकेटपट्टूंचे अनेक संघ नवी मुंबईत मोठ्या संख्येने आहेत. हे नवी मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे.
अशा चाळीशी नंतरही क्रिकेटच्या माध्यमातून आरोग्याची जपणूक करणा-या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 40 + क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. मधील कोरोना प्रभावीत कालखंडात 2 वर्षांनंतर नव्या उत्साहाने नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 3 व 4 मार्च रोजी घणसोली येथील 40 + क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे.
3 मार्च रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना खेळविण्यात येणार असून 4 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
तरी याप्रसंगी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 40+ खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-03-2023 13:56:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update