35 हजाराहून अधिक नवी मुंबईकर विद्यार्थी उत्साहात गाजवताहेत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सव

नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाकडून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 -23 चे आयोजन करण्यात आले असून मधल्या कोरोना प्रभावित 2 वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर या स्पर्धा होत असल्याने मागील स्पर्धांपेक्षा अधिक संख्येने व उत्साहाने विद्यार्थी सहभागी होताना दिसत आहेत. यावर्षी तब्बल 235 शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी केलेली असून 35 हजाराहून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी यात उत्स्फुर्त सहभाग नोंदविलेला आहे.
यावर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात आत्तापर्यंत यशवंराव चव्हाण फुटबॉल मैदानावर 14,17 व 19 वर्षाआतील मुले व मुलीच्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथे कॅरम व बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जलतरण, टेबल टेनिस व रायफल शूटिंग स्पर्धा फादर ॲग्नल स्पोर्ट्स सेंटर, वाशी येथे तसेच हॅंडबॉल व बॅडमिंटन स्पर्धा रायन इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ येथे संपन्न झाल्या.
यामधील योग स्पर्धांचे नमुंमपा माध्यमिक शाळा क्र.103 ऐरोली येथे तसेच किक बॉक्सिंग स्पर्धेचे वारकरी भवन सीबीडी येथे आयोजन करण्यात आले. बास्केटबॉल व सेपकटकरा स्पर्धा क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे येथे आणि व्हॉलीबॉल स्पर्धा ह्या नॉर्थ पाँईंट स्कुल कोपरखैरणे येथे तसेच हॉकी, रोल बॉल, रोलर हॉकी स्पर्धा या फादर ॲग्नल स्कुल वाशी येथे संपन्न झाल्या.
सानपाडा येथे महानगरपालिकेने विकसित केलेल्या कुस्ती आखाडा मध्ये कुस्ती स्पर्धा व नमुंमपा शाळा क्रं.94, कोपरखैरणे येथे वुशू स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्वात जास्त विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग असलेली सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ॲथलेटिक्स स्पर्धा महानगरपालिकेच्या राजीव गांधी स्टेडियम, सीबीडी बेलापूर येथे संपन्न झाली. यामध्ये 127 शाळांमधून 2500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग होत आपले क्रीडानैपुण्य प्रदर्शित केले. सर्वच गटांत आणि प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम खेळाचे प्रदर्शन करणारे संघ, खेळाडू हे मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेकरिता पात्र ठरलेले आहेत.
आगामी काळात खोखो, कबड्डी, कराटे, तायक्वॉंदो, रोलर स्केटिंग, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल व इतर उर्वरित खेळांच्या स्पर्धांचे अशाचप्रकारे नियोजनबध्द पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांना व त्यामधील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्तरावरील स्पर्धा म्हणून या स्पर्धेत खेळून थेट विभागीय स्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी मिळत आहे यादृष्टीने या स्पर्धेचे महत्व मोठे आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शाळांनी घ्यावा आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी यामध्ये सहभागी होत आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करून आपल्या शाळेच्या नावासोबतच नवी मुंबई शहराचे नाव सुध्दा मोठे करावे हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश आहे.
या संपूर्ण स्पर्धा आयोजनाव्दारे विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिका करीत असून त्यापुढे जात गुणवंत खेळाडूंना आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी विशेष क्रीडा शिष्यवृत्ती देखील दिली जात आहे. अशाप्रकारे क्रीडा शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होऊन जागतिक स्तरावर नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू तयार व्हावेत यासाठी आगामी काळात विविध खेळांच्या दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे कामही नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेण्यात आले आहे.
नवी मुंबईतील तब्बल 235 शाळांचा सहभाग असलेला इतक्या मोठ्या प्रमाणावर संपन्न होणारा हा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेचा क्रीडा विभाग नियोजनबध्दपणे काम करीत आहे.
क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे हे सर्व स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवित आहेत. तसेच क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव हे क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक स्पर्धा योग्य रितीने पार पडण्यासाठी प्रत्येक स्पर्धास्थळी उपस्थित राहून नियोजनबध्दरित्या आयोजन कार्य करीत आहेत.
या सा-यांच्या सहयोगातून संपन्न होत असलेल्या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमधून विजयी होत पुढील मुंबई विभागीय स्तरावर पात्र ठरलेल्या खेळाडूंना महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या वतीने पुढील स्तरावरील स्पर्धेकरिता शुभेच्छा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत,
Published on : 19-12-2022 06:22:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update