800 किलो प्लास्टिक साठा जप्त करीत करावेगांवातील दुकानही सील

पर्यावरणाला हानीकारक असणा-या प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईदेखील कऱण्यात येत आहे.
अशाच प्रकारे बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशव्या वितरण कऱणा-या एका महिलेवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सीवूड परिसरात एक महिला स्कुटीवर येऊन दररोज विक्रेते, फेरीवाले यांना प्लास्टिक पिशवी विक्री करत असल्याची खबर महानगरपालिकेच्या बेलापूर विभाग प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाला प्राप्त झालेली होती. त्यास अनुसरून या पथकाने बारकाईने लक्ष ठेवत सापळा रचून प्लास्टिक पिशव्या विक्री करणा-या महिलेला रंगेहाथ पकडले व तिच्याकडून 30 किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून पहिल्या वेळी गुन्हा करताना आढळल्याने रु. 5000/- रक्कमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक तपासणी केली असता ती महिला करावेगाव येथील महादेव ट्रेडर्स यांच्याकडून पिशव्या घेऊन त्या विकत असल्याची अधिकची माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार पथकाने करावे गाव येथे महावीर ट्रेडर्स दुकानावर धाड टाकून त्यांच्या गोडाऊनमध्ये सिंगल यूज प्लास्टिक तसेच कंटेनर, चमचे, गार्बेज पिशव्या, प्लास्टिक बंदी असलेल्या वस्तू अशाप्रकारे साधारणत: 800 किग्रॅ. प्लास्टिक वस्तूंचा साठा आढळून आला. यापूर्वीही सदर दुकानदारावर दोन वेळा कारवाई करण्यात आली असल्याने त्यांनी तरीही प्लास्टिक प्रतिबंधात्मक नियमांचे तिस-यांदा उल्लंघन केल्याने त्यांच्याकडून रु.25000/- दंड वसूल करण्यात आला तसेच त्यांचे गोडाऊन सील करण्यात आले. त्याचप्रमाणे नियमानुसार त्यांच्यावर एफआयआऱ दाखल कऱण्याची कारवाई सुरु कऱण्यात आलेली आहे.
बेलापूर विभागाच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी ही धडक कारवाई केली. अशाप्रकारे प्लास्टिक प्रतिबंधात्मक दंडात्मक कारवाया या पुढील काळात अधिक प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.
Published on : 21-10-2022 13:00:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update